श्रीरंग कलानिकेतन
श्री. शरद जोशी

२७ नोव्हेंबर १९३४ - ११ मे २०१९

श्रीरंग कलानिकेतन


श्रीरंग कलानिकेतन या संस्थेची स्थापना १ जून १९८५ मध्ये झाली. प्रत्येक चांगले काम सुरु होण्यासाठी काही घटना निमित्त असते. संस्थापक श्री. शरद जोशी यांचा मुलगा हर्षल याचा प्रवासी बसच्या अपघातामध्ये मृत्यू झाला. श्री. शरद जोशी व त्यांच्या सुविद्य पत्नी शीला जोशी यांना एक मुलगा व एक मुलगी अशी अपत्ये होती.  त्यातून हर्षलच्या, जो हुषार तसेच गायन करणारा होता, अचानक जाण्याने जोशी कुटुंबीय व्यथित झाले होते. अशावेळी त्यांच्या जवळच्या नातेवाईक तसेच मित्र परिवाराने त्यांना हर्षलच्या स्मृती निमित्त एक संस्था काढण्यास उद्युक्त केले जेणेकरून जोशी कुटुंबीय संगीताचा प्रचार करण्यामध्ये मग्न होतील व त्यांचे दु:ख कमी होईल.


हर्षलचे दुसरे नांव श्रीरंग होते आणि म्हणूनच नवीन सुरु केलेल्या संस्थेला श्रीरंग कलानिकेतन हे नांव देण्याचे ठरले. या संस्थेने संगीताचा प्रचार करताना देशभर गाजलेल्या निरनिराळ्या कलाकारांना बोलावून त्यांचे कार्यक्रम तळेगावात घडवले आणि तळेगाव तसेच आसपासच्या परिसरातील रसिकांना तृप्त केले.


संस्था चालवायची म्हणजे आर्थिक मदत हवी. त्यासाठी संस्था धर्मादाय आयुक्तालयामध्ये नोंदणीकृत करण्यात आली. तळेगाव व पुण्यातील अनेक देणगीदारांना गांठून श्री. शरद जोशी यांनी तसेच विद्यमान अध्यक्षांनी मदत मिळवली व संस्थेचे काम नेटाने सुरु केले. श्री. जोशी आणि संस्था स्थापनेपासून बरोबर असलेले कै. कृ.ग. उर्फ दादा महाजन यांनी पुणे, मुंबई तसेच इतर ठिकाणच्या अनेक रसिकांना गांठून संस्थेचे आजीव सभासदत्व दिले. संस्थेच्या वाटचालीत व वाढीत अनेकांचे सहाय्य लाभले. सर्वांचा उल्लेख करणे शक्य नाही. पण संस्थेचे माजी अध्यक्ष दादा केतकर, दादा महाजन, वर्षाताई किबे, विदुर महाजन, प्रा. दीपक बिचे, प्रा. शिरीष अवधानी, प्रकाशराव जोशी  आणि विद्यमान अध्यक्षा डॉ. नेहा कुलकर्णी आणि  कार्यवाह विनय कशेळकर यांचा उल्लेख आवर्जून करावाच लागेल.


संस्थेचे स्वत:चे सभागृह हवे असे वाटल्यामुळे कै. दादा महाजन व इतर सहकार्यांनी अथक प्रयत्न करून वनश्री नगर येथील राखीव जागेत सर्व संबंधितांची रीतसर परवानगी घेऊन सभागृह बांधण्यास सुरुवात केली. योगिनी जोगळेकर, रामदास कामत आणि बाळासाहेब किबे यांच्या उपस्थितीत रंगमंचाचे शानदार उद्घाटन झाले २००४ साली डॉ.अरुण चितळे एका कार्यक्रमाला उपस्थित होते त्यावेळी रंगमंचासमोर कनाती उभारल्या होत्या.  त्यांनी २ लाख रुपये देणगी देऊन रंगमंचासमोर सिमेंटच्या पत्र्यांचे व स्टील पाईपाचेच हात उभारून दिले. डॉ. शोभना चितळे (शरद जोशींच्या भगिनी) अमेरिकेस त्यांच्या बहिणीकडे – तारा पटवर्धन यांच्याकडे गेल्या असताना श्रीरंग कलानिकेतनच्या वास्तू विषयी चर्चा झाली आणि तारा पटवर्धन यांनी तात्काळ दहा हजार डॉलर्सचा चेक दिला आणि सभागृहाला भिंती आल्या आणि २००५ सालचा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आपल्या सभागृहात दिमाखाने पार पडला. केवळ एका महिन्यात मेहनतीचा एकही पैसा न घेता विभास साठे यांनी हे काम पूर्ण करून दिले.


स्थापनेपासून संस्था दरवर्षी एक संगीत महोत्सव आयोजित करते. संस्थेच्या वतीने दरवर्षी संगीत विषयी राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या जातात. या स्पर्धेचा बोलबाला सर्वत्र आहे. २०१८ सालात संस्थेने बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून संगीत स्पर्धेची निवड फेरी आंतरजालाच्या (internet) मदतीने घेतली. त्यातून २०१  स्पर्धकांची निवड करून अंतिम फेरी तळेगावातील हेरीटेज आर्ट्स अँड म्युझिक अकादमीच्या निसर्गरम्य वास्तूत संपन्न केली.


देणगीदारांच्या तसेच विश्वस्त व कार्यकारिणीच्या उत्साही कार्यकर्त्यांच्या मदतीने संस्था आपली वाटचाल जोमाने पुढे चालू ठेवील यात शंका नाही. श्री. शरद जोशी यांचे वृद्धत्वाने तसेच अल्पआजाराने वयाच्या ८३ व्या वर्षी दि. ११ मे २०१९ रोजी निधन झाले.

श्रीरंग कला निकेतन
वनश्रीनगर, तळेगाव दाभाडे,
जिल्हा- पुणे ४१०५०७
+91 75074 87784
shrirangkalaniketan@gmail.com
© 2026 Shriranga Kala Niketan. All Rights Reserved
Designed by aplap software